निरंतर भटकंती व ऐतिहासिक लेखनाची परंपरा नसल्याने या समाजाचा पुरेसा इतिहास आज उपलब्ध नाही. काही संदर्भ समाजाचे भाट महाराजांकडून, काही ऐकीव माहितीच्या आधारे समाजाचा इतिहास खालीलप्रमाणे मांडत आहोत.
दोरीक समाज हा हिंदू धर्माचा एक घटक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्येने आणि त्यातल्या त्यात मोठ्या संख्येने खान्देशात आढळून येणारा हा समाज आहे. दोरीक समाजाच्या भाट महाराजांच्या कडे असणाऱ्या नोंदीवरून सदर समाज हा साधारणतः ३०० वर्षापूर्वी राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रात आलेला होता. व येथेच स्थिरस्थावर झालेला आहे. दोरीक समाजाची वसाहत त्या काळात साधारण १८ गावांमध्ये होती. समाजाचा मुख्य व्यवसाय शेती व शेत मजुरी होता. सदर समाजाने संयुक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केलेला आढळतो.दोरीक समाज विस्तार १२ कुळांमध्ये विभागला असुन त्यांची नावे, कुलदैवत व त्यांची ठिकाणे शेजारील Link सविस्तर देण्यात आलेली आहेत.
दोरीक समाज हा सरस्वती या देवतेचे वरदान लाभलेला अती अल्पसंख्याक समाज आहे.सुसंस्कृतपणा, प्रामाणिकपणा, चिकाटी, उद्यमशीलता आणि अध्यात्मिक बैठक यांच्या जोरावर समाज बंधूनी समाजाचा पाया आजही पक्का करून ठेवला आहे.
समाजाचा नेमका उगम कुठे झाला ? मूळ समाज पुरुष कोण ? समाजातील कुळांची कुटुंब संख्या कमी अधिक का आहे ? असे अनेक प्रश्न अजुन तरी अनुत्तरीतच आहेत. सदर प्रश्नांची उकल करणे व योग्य समाधान संदर्भासहीत शोधुन काढणे हे आमचे दोरीक समाजाचा घटक म्हणून मुख्य कार्य आहे. तसेच दोरीक समाजास केंद्राच्या इतर मागासवर्गीय यादी मध्ये समावेश करण्या बाबत प्रयत्न करणे हे देखील आमचे एक कार्य आहे.